सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना रंगेहात पकडले
मांडवगण फराटा, दि. 22 (वार्ताहर) – शिरसगाव काटा (ता. शिरूर) परिसरामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत पंप, केबल, पाइपची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा नदीकाठी लावलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पर्दाफाश केला आहे.
येथील घोडनदी काठच्या शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी चोरट्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत बाळासाहेब नारायण विधाते यांनी मांडवगण फराटा दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. गणेश कानिफ कदम (वय 28, रा. शिरसगाव काटा) सूर्यकांत दत्तात्रय माने (वय 23, रा. वडगाव रासाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मनोज भैरू कोळपे (रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) बाबू दादा कोळपे (रा. शिरसगाव काटा) हे दोघेजण फरार झाले आहेत.
शिरसगाव काटा परिसरात गेल्या काही दिवसांपासून नदीकाठी तसेच विहिरीवर लावलेले विद्युत पंप, वायर व पाइप चोरी जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी एकत्र येत घोड नदीकाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते.
बाळासाहेब विधाते यांची (दि. 8) ऑगस्ट रोजी नदीकाठी बसवलेली 12 एचपीची विद्युत मोटार वीज गेल्यामुळे बंद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विद्युत मोटार सुरू झाली नाही, म्हणून त्यांनी व त्यांच्या पुतण्याने नदीकाठी जाऊन पाहणी केली असता त्यांना मोटार चोरीला गेल्याचे दिसून आले.
नदीवरील लावण्यात आलेल्या विद्युत मोटरीजवळील रोहित्राला जोडलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन व्यक्ती (दि. 20) ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास फिरत असल्याचे दिसत आहे, असे गावातील कुलदीप शिंदे यांनी फोन करुन सांगितले.
त्यावेळी फिर्यादी, त्यांचा पुतण्या तसेच गावातील इतर शेतकरी मोटारीजवळ जात असताना दोन व्यक्ती त्यांच्या कडील मोटरसायकलवरून जागेवर सोडून अंधारातून पळून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना पकडले. त्यांना त्यांच्या ताब्यातील (एमएच 16 एडी 4130) या मोटरसायकलसह पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गावातील तब्बल सोळा ते सतरा शेतकऱ्यांच्या विद्युत मोटार, पाइप, वायर चोरी गेल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी आरोपी गणेश कदम यांच्याकडे चौकशी केली असता, त्याने फिर्यादीची मोटार मनोज भैरु कोळपे, बाबू दादा कोळपे यांच्या मदतीने चोरली असून मनोज भैरु कोळपे याला देऊन 2 हजार रुपये घेऊन वाटून घेतल्याचे कबूल केले. पुढील तपास मांडवगण फराटा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार सुभाष रूपनवर, योगेश गुंड, अक्षय काळे हे करीत आहेत.