बारामती (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार जळोची येथील जनावरांच्या बाजाराकडे शेतकऱ्यांनी अक्षरशा पाठ फिरवली. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने बंद असलेला जनावरे बाजार गुरुवारी (दि. २८) सुरु झाला खरे मात्र पहिल्याच दिवशी बाजारात केवळ दहा जनावरांची नोंद झाली.
पुणे जिल्ह्यातील बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेला जळोची उपबाजार जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाने गुरुवार पासून सुरू करण्यात आला परंतु करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे व्यापारी व पशुपालक शेतकरी यांनी या बाजाराकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहावयास मिळाले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात फक्त दहा जनावरांची नोंद झाली .
गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला बैल बाजार सुरू करण्यात आला परंतु इतर जिल्ह्यातून येणारे व्यापारी व पशुपालक शेतकरी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर व लाॅकडाऊनमुळे बारामतीच्या जनावरे बाजाराकडे पाठ फिरवली . जनावरे बाजार सुरू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
इतर तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यातील जनावरे बाजार सुरु झाल्यानंतर बारामती येथील जनावरे बाजाराला चांगला प्रतिसाद मिळेल असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक खलाटे व उपसभापती बाळासाहेब पोमणे तसेच सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.