लाहोर – पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अन्यायांबाबत पाकिस्तानातील अल्पसंख्यांक आयोगाने तिथल्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर शहरात अल्पसंख्यांक हिंदू आणि ख्रिश्चन समाजाची घरे पाडली जात आहेत. राजकीय वरदहस्तामुळे स्थानिक प्रशासनाने शेकडो घरे जमिनदोस्त केली आहेत, असे अल्पसंख्यांक आयोगाने म्हटले आहे.
पंजाबमध्ये अल्पसंख्यांकांच्या घरांबाबतचे वृत्त स्थानिक माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यावर पाकिस्तान अल्पसंख्यांक आयोगाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात आयोगाने ट्विटकरून सरकारबाबतची आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पंजाबमधील घटनेचा एक व्हिडीओदेखील अलिकडेच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. बहावलपूरमधील अल्पसंख्यांक हिंदू समाजाची बस्ती जमिनदोस्त केली जात असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री तारिक बशीर चीमा आणि पाकिस्तानचे मुख्य माहिती अधिकारी शाहिद खोकर यांच्या देखरेखीखालीच ही पाडापाडी सुरू असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
पाकिस्तानमध्ये मानवी हक्कांचे उघड उल्लंघन होणे ही उघड बाब आहे. यापूर्वीही सामूहिक हिंसा, वांशिक हत्याकांड, न्यायबाह्य हत्या, अपहरण, बलात्कार, जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर इत्यादी अपराध उघडपणे केले गेले आहेत.