अकोला -राज्यात तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विदर्भात सर्वाधीक तापमानाची नोंद झाली आहे. असे असताना अकोल्यात एका शेतकऱ्याचा उष्मघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकोला शहरातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे.
शहरातील तापमानाचा पारा 43 अंश सेल्सियसच्यावर पोहोचला आहे. अकोला हे देशातील दुसऱ्या तर जगातील नवव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. जिल्ह्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी आहे. समाधान शिंदे, वय 50 असे या शेतकऱ्याचे नाव असून ते जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात येत असलेल्या सारकिन्ही या गावातील रहिवासी होते. शेतात काम करताना समाधान शिंदे हे चक्कर येऊन खाली पडले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.