पुणे – महापालिकेच्या बांधकाम आणि मिळकतकर विभागाने करोनाच्या दोन वर्षांच्या संकटकाळातही वार्षिक उत्पन्नांचे नवे “विक्रम’ प्रस्थापित केले आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात 31 मार्च अखेर बांधकाम विभागास तब्बल 2 हजार कोटींचा महसूल मिळाला असून मिळकतकर विभागानेही विक्रमी 1846 कोटींचा महसूल वसूल करीत नवा विक्रम घडविला. परिणामी, गेल्या पाच वर्षांपासून चार हजार कोटींवर अडकलेला महापालिकेच्या उत्पन्नाचा गाडा या वर्षी तब्बल सहा हजार कोटींवर जाण्याची आशा निर्माण झाली आहे.
बांधकाम विभागाचे उत्पन्नाच्या “विक्रमाचे इमले’
बांधकाम विभागास 2021-22 मध्ये 1185 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याच्या जवळपास दुप्पट महसूल जमा झाला आहे. या वर्षभराच्या कालावधीत बांधकाम विभागाने 698 नवीन बांधकाम प्रकल्पांसह एकूण 2775 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यासाठी करोना स्थिती लक्षात घेऊन बांधकाम विभागाने ऑटो डी.सी.आर. प्रणाली कार्यक्षमपणे राबविणे, शासनाच्या बांधकाम विषयक योजनांची प्रभावीपणे अंमलबजाबणी करणे, 2017 नुसारच्या बांधकाम नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी करणे या माध्यमातून हे उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठले आहे.
मिळकतकर वसुलीचा उच्चांक…
मिळकत विभागानेही वसुलीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा 1800 कोटींचा टप्पा करण्यात प्रशासनास यश आले आहे. 2018-19 मध्ये महापालिकेच्या मिळकतकराचे वार्षिक उत्पन्न अवघे 1184 कोटी होते हे उत्पन्न मागील दोन वर्षे करोना संकट असतानाही तब्बल 1846 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या वर्षभराच्या कालावधीत 8 लाख 68 हजार 671 मिळकतधारकांनी हा कर जमा केला असून त्यात सर्वाधिक 70 टक्के कर ऑनलाइन जमा झाला आहे तर रोख रकमेच्या स्वरूपात 17 टक्के आणि धनादेशाच्या स्वरूपात 13 टक्के कर जमा झाला आहे. तर या वर्षी सुमारे 71 हजार नवीन मिळकती कर आकारणीत आलेल्या आहेत. तर थकबाकी असलेल्या 7 हजार 300 मिळकती सील करण्यात आलेल्या आहेत.
बांधकाम विभागाकडून गेल्या वर्षभरात उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या तसेच बांधकामांना तातडीने परवानगी देण्यासाठी ऑटो डीसीआर प्रणाली राबविण्यात आली आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीचा टप्पा गाठता आला आहे.
– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, मनपा
मिळकतकर विभागाकडून करोनाची स्थिती लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून वसूलीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. थकबाकी वसुलीसह नवीन कर आकारणी, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सोपी यंत्रणा, वसुलीसाठी विशेष नियोजन केले असल्याने विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. – विलास कानडे, कर संकलन विभागप्रमुख