मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात मंगळवारी सनरायझर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सने पराभव केला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हैदराबादचा 61 धावांनी पराभव झाला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याला पंचांनी झेलबाद असल्याचा निर्णय दिला होता. आता हाच निर्णय पंचांनी चुकीचा दिल्याचा दावा हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मुडी यांनी केला असून या प्रकरणावरून वादही सुरू झाला आहे.
या सामन्यात देवदत्त पडिक्कलने प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर विल्यमसनचा झेल घेतला होता. मैदानावरील पंचांनी विल्यमसनला बाद देण्यापूर्वी तिसऱ्या पंचाचा सल्ला घेतला आणि तेथेही सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधाराच्या विरोधात निर्णय गेला.
विल्यमसनला बाद घोषित केल्याने त्यांना धक्का बसला होता. प्रसिद्ध कृष्णाचा चेंडू विल्यमसनच्या बॅटला लागून यष्टीरक्षक कर्णधार संजू सॅमसनच्या ग्लोव्हजला लागला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पडिक्कलच्या दिशेने गेला. चेंडू पडिक्कलच्या थोडा पुढे पडणार होता, त्यामुळे त्याला हा झेल घेण्यासाठी डाइव्ह मारावी लागली.
रिप्लेमध्ये चेंडू जमिनीला लागून पडिक्कलच्या हातात गेल्याचे दिसत असतानाही पंचांनी विल्यमसनला बाद दिले. तिसऱ्या पंचांना वाटत होते की, पडिक्कलची बोटे चेंडूखाली होती. त्यामुळेच त्यांनी विलियमसनला बाद दिले. आता याबाबत हैदराबाद संघ व्यवस्थापन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.