मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला बुधवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंतिम संस्कार करून अखेरचा निरोप दिला.
आपल्या लाडक्या खेळाडूला निरोप देण्यासाठी एमसीजीवर ऑस्ट्रेलियासह जगभरातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटू, कलाकार आणि राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी तब्बल 50 हजारांपेक्षा जास्त चाहते देखील उपस्थित होते.
या मैदानाशी वॉर्नचे खूप खास नाते होते. त्याने याच मैदानावर 700 कसोटी बळींचा टप्पा पार केला होता आणि ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला होता. त्यामुळे या मैदानातील एका स्टॅण्डला वॉर्नचे नावही दिले गेले. गेल्या चार मार्चला थायलंडमधील कोह सामुई येथे वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.