विनोद मोहिते
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात
इस्लामपूर – इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारसंघात आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी व अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांच्यात खरी लढत होत आहे. सातव्यांदा विजयी होण्यासाठी आमदार पाटील कुटुंब तर विधानसभेत प्रथमच प्रवेश करण्यासाठी नायकवडी व नगराध्यक्ष पाटील कुटुंब प्रचारात व्यस्त आहेत.
जयंत पाटील यांचे संपुर्ण कुटुंब प्रचारात दंग झाले आहे. 1990 पासून जयंत पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. सलग सहा वेळा ते विजयी झाले आहेत. सातव्यांदा नशिब आजमावत आहेत. सध्या कुटुंबातील सर्व सदस्य प्रचारात जोमाने सक्रिय सहभागी आहेत. पत्नी शैलजा पाटील, मुले प्रतीक व राजवर्धन हे गावोगावी बैठका घेण्यात व्यस्त आहेत. जयंत पाटील स्वतः राज्यातील विविध मतदार संघात प्रचारासाठी असल्याने यांचे समर्थक पडद्यामागून मोठ्या हालचाली करत आहेत. दोन्ही मुलांनी तरुणांचे चांगले संघटन केले आहे. ते तालुक्यातील प्रचारात व्यस्त आहेत. शैलजा या महिलांच्या गाठीभेटी घेऊन केलेल्या कामांची माहिती महिलांना पटवून देत आहेत. महिलांच्या पदयात्रा काढत आहेत.
निशिकांत पाटील यांची ही फॅमिली प्रचारात सक्रिय झाली आहे. थेट नगराध्यक्ष म्हणून विरोधी गटातून निवडणूक जिंकल्याने पाटील कुटुंबात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पाटील हे विधानसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरले आहेत. त्यांच्या पत्नी सौ. सुनीता या शहरातील विविध प्रभागात होम टू होम भेटून नगराध्यक्ष पाटील यांना मतदान करण्याचे साकडे घालत आहेत. निशिकांत पाटील यांनी भाजपा पक्षातून इस्लामपूर मतदारसंघात दोन वर्षांपासून जोरदार मोर्चेबांधणी केलेली होती. मतदार संघ शिवसेनेने पटकवल्याने निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली आहे.
शहरातील महिलांशी सतत संपर्क ठेवत अपक्ष उमेदवार म्हणून मिळालेले कपबशी चिन्ह सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांनी सध्या ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले आहे. वाड्या-वस्त्यांवर जाऊन पाटील यांनी इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष असताना केलेल्या कामाची माहिती करुन दिली जात आहे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर शहराचा झालेला कायापालट महिलांना सांगत आहेत.
गौरव नायकवडी यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी, स्नेहल, चुलते वैभव नायकवडी, चुलती नंदिनी व जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सुषमा नायकवडी या प्रचारात आहेत. तर गौरव यांचे चुलत भाऊ केदार व वीरधवल यांनी तरुणांचे संघटन करुन मतदारसंघ पिंजून काढला आहे.