स्वतःची आई बदलणाऱ्या बांडगुळाला धडा शिकवा : भिलारे

मदन भोसले यांच्यावर हल्लाबोल

सातारा  – 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला स्वतःच्या आईचा दर्जा देऊन, “मी माझी आई कधीच बदलणार नाहीत. आई बदलणारी आमची बांडगुळासारखी औलाद नाही, असे सांगणाऱ्या बांडगुळाने स्वतःची आईच बदलली. अशा बांडगुळाला कायमचा धडा शिकवा, असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी मदन भोसले यांच्यावर केला.

वाई विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आ. मकरंद पाटील यांच्या प्रचारासाठी पाचगणीत झालेल्या सभेत ते बोलत होते. आ. पाटील, उपनगराध्यक्ष आशा बगाडे, नानासाहेब कासुर्डे, गॅब्रिएल फर्नांडिस, नगरसेवक नारायण बिरामणे,विनोद बिरामणे, अनिल वन्ने, शेखर कासुर्डे, विजय कांबळे, पृथ्वीराज कासुर्डे, रेखा कांबळे, अपर्णा कासुर्डे, रेखा जानकर, हेमा गोळे, सुमन गोळे, विठ्ठल बगाडे, माजी उपनगराध्यक्ष इर्शाद शेख, निसारभाई, अनिता चोपडे, प्रकाश गोळे, हरीश गोळे, शरद कासुर्डे, विठ्ठल गोळे उपस्थित होते. मदन भोसले यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत केलेले भाषण बाळासाहेब भिलारे यांनी उपस्थितांना ऐकवले.

ज्यांना आपल्या तालुक्‍याची जाणीव नाही, त्यांना हद्दपार करा. आ. मकरंद पाटील यांनी सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे, म्हणून जननायक ही जनतेने दिलेली पदवी मिरवणारा हा महाराष्ट्रातील पहिला आमदार आहे. ज्या घरात कॉंग्रेसने सरपंचपद, आमदारकी, मंत्रिपद, खासदारकी, प्रदेशाध्यक्षपद, अशी सगळी पदे दिली तरीही त्यांनी कॉंग्रेसशी गद्दारी केली. त्यांना मतदार माफ करणार नाहीत. कपड्याची इस्त्री खराब होऊ नये, याची दक्षता घेणारा हा माणूस असून पाच वर्षांत मतदारसंघात न फिरकणाऱ्या आणि निवडणूक लागली की मतदारांचा पुळका येणाऱ्या स्वार्थी माणसाला चांगलीच अद्दल घडवा. आ. पाटील आणि श्रीनिवास पाटील यांनाच निवडून देण्याचे आवाहन भिलारे यांनी केले.

आ. पाटील म्हणाले, प्रत्येक पावसाळ्यात पाचगणीत रस्त्यांवर खड्डे पडत होते, म्हणून सव्वादोन कोटी रुपये मंजूर करून हा बाजारपेठेतील रस्ता कॉंक्रिटचा करून घेतला. आता सुरुरपासून महाबळेश्‍वरपर्यंत कॉंक्रिट रस्त्याचा 1200 कोटी रुपयांचा प्रस्ताव असून हे काम करूनच दाखवणार आहे. माझ्या जोडीला श्रीनिवास पाटील असतील तर अजून जोमाने काम करू.

पाचगणीनेही तेरा रत्ने निवडून दिली असून प्रश्‍नांचा पाठपुरावा करण्याची त्यांची चिकाटी वाखाणण्याजोगी आहे. राजेंद्र राजपुरे म्हणाले, या सभेतील गर्दी पाहिल्यावर 24 तारखेचा निकाल काय असेल, ते स्पष्ट झाले आहे. आबा आपल्यासाठी अहोरात्र झटतात. विरोधी उमेदवार पाच वर्षात मतदारसंघात दिसला नाही. ज्यांना इथल्या गावांची नाव माहिती नाही, त्यांना कांदाटी खोरे कसे समजणार? आबांना काहीही काम सांगा, ते करणारच. रात्री 12 ला फोन लावला तरी उचलणारच. ही निवडणूक आता लोकांनी हाती घेतली आहे. अनिल वन्ने, शेखर कासुर्डे यांनी मनोगत व्यक्‍त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.