पाणी सोडण्यासाठी बनावट चाव्या, व्हॉल्व्हमन?

महापालिकेकडून तपासणी सुरू : निवडणुकीच्या तोंडावर प्रकार सुरू

पुणे – शहरात मे आणि जून महिन्यात कडक उन्हाळा असताना पालिकेकडून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार नसताना, भर पावसाळ्यात शहरातील पाणीपुरवठा अचानक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विस्कळीत झाला आहे. तसेच काही ठराविक भागांतच पुरेसे पाणी जात असून हा भाग महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हच्या बनावट चाव्या तसेच खासगी व्हॉल्व्हमन नेमून हे पाणी पळविले जात असल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पालिकेने कमी पाणी जाणाऱ्या भागांची तपासणी सुरू केल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली.

शहराची वाढती लोकसंख्या तसेच तरल लोकसंख्या लक्षात घेता, महापालिकेकडून शहरासाठी प्रतिदिन 1350 एमएलडी पाणी खडकवासला धरणातून घेतले जाते. हेच पाणी उन्हाळ्यातही कायम होते. मात्र, उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने पालिकेस वडगाव जलशुद्धीकरण केंद्रा अंतर्गत एक दिवस पाणी बंद ठेऊन ती पूर्ण करता आली. त्यामुळे कोणतेही वाद अथवा अडचण निर्माण झाली नव्हती. त्यानंतर पावसाळ्यात पुन्हा पाण्याची मागणी घटल्याने पाणीपुरवठा सुरळीत होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

त्यातही प्रमुख्याने पर्वती, लष्कर जलकेंद्रातून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यात हडपसर, वडगावशेरी, चंदननगर, खराडी या भागांचा समावेश आहे. तसेच मध्यवर्ती भागांत ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष वगळता इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या प्रभागात कमी दाबाने तसेच कमी वेळ पाणी जात आहे.

त्यामुळे या भागातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून लोकप्रतिनिधींनीही विधानसभेच्या तोंडावर पाणी पळविल्याचा आरोप केला आहे. मात्र, अचानक कमी झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे प्रशासनही चक्रावले आहे.

पाणीपुरवठा विस्कळीत
इतर प्रभागातील पाणी आपल्या भागात वळविण्यासाठी बनावट चाव्या आणि व्हॉल्व्हमन नेमण्यात आल्याची शक्‍यता पालिका प्रशासनाकडून व्यक्‍त होत आहे. प्रत्येक प्रभागासाठी कितीवेळ आणि व्हॉल्व्हमधून किती पाणी सोडायचे याचे नियम माहिती तसेच वेळा व्हॉल्व्हमनला निश्‍चित करून दिल्या आहेत. त्यामुळे हे व्हॉल्व्हमन पाणी सोडून निघून गेल्यानंतर काही वेळात अनेक भागात पाणी गायब होत आहे. त्यामुळे कोणीतरी बनावट चाव्या वापरून पाणी वळवित आहे. त्यामुळे ज्या भागात पाणी व्हॉल्व्हमधून कमी जात आहे तिथे तपासणी करण्यात येत असून काही भागात व्हॉल्वमन ठराविक आट्या सोडून गेल्यानंतर त्या कमी झाल्याच्या तसेच काही ठिकाणी वाढविण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)