मुंबई – महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजजकीय नात्यावर अखेर आज (गुरुवारी) पडदा पडणार आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज राज भवनाच्या दरबार हॉलमध्ये सायंकाळी ७.३० वाजता शपथ घेतील. शिंदे यांच्या बंडानंतर ते भाजपसोबत सत्ता स्थापन करतील हे स्पष्ट होत. फडणवीस हे मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री असेच चित्र पाहायला मिळेल हे देखील गृहीत धरण्यात आले होते. मात्र राज्यपालांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करत सर्वानाच अनपेक्षित धक्का दिला.
आपण मंत्रिमंडळात नसू मात्र बाहेर राहून मार्गदर्शन करू असेही फडणवीस यांनी स्पष्ठ केले होते. अशातच आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिंदेंच्या मंत्रिमंडळात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा असा आग्रह केंद्रीय मंत्रिमंडळाकडून करण्यात येतोय.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी फडणवीस यांनी याबाबत आवाहन केले आहे. याबाबत जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये नड्डा यांनी फडणवीस यांचे शिंदे मंत्रिमंडळात असणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी असा आग्रह नड्डा यांच्यामार्फत करण्यात आला होता. यानंतर नड्डा यांनी ट्विट करत फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी माहिती दिली.
तत्पूर्वी, फडणवीस यांची मंत्रिमंडळात येण्याची तयारी नसून त्यांना पुढील काळात राज्यात पक्षविस्ताराचे काम करायची इच्छा होती. सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वापुढे आपल्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा द्यावी अशी मागणी देखील केली होती. मात्र पक्षनेतृत्वाने उपमुख्यमंत्रीपदाची गळ घातल्याने त्यांना आपला निर्णय बदलावा लागला.
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून एकीकडे शिंदे यांच्या नावाची घोषणा तर दुसरीकडे फडणवीस यांची मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याची घोषणा असे दोन धक्के मिळाले होते. अशातच आता फडणवीस हे मंत्रिमंडळात सामील होणार असल्याची माहिती यांमुळे शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याच्या निर्णयानंतर फडणवीस नाराज आहेत का? अशी शंका उपस्थित करण्यास वाव आहे.
शिंदे हे आज सायंकाळी ७.३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असले तरी यापेक्षाही मंत्रिमंडळात सामील न होण्याचा फडणवीसांचा निर्णय, त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांना मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी केलेला आग्रह व अखेर फडणवीस मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची घोषणा याचीच चर्चा अधिक रंगली होती.
देवेंद्र फडणवीस यांना विचारात न घेता शिंदेंना मुख्यमंत्री?
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नावाची घोषणा स्वतः फडणवीस यांनीच केली होती. मात्र शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना विचारात न घेता घेण्यात आला होता का? की फडणवीस यांना शिंदे यांना मुख्यमंत्री पद देणे मान्य नव्हते? अशीही चर्चा रंगली आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांचे जुनियर सहकारी म्हणून काम केले होते. अशात आता फडणवीस यांना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार असल्याने ते नाराज आहेत का? असा सवाल देखील उपस्थित होतोय.