मुंबई – एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी ठरले असून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. शिंदे यांच्या बंडानंतर ते भाजपसोबत सत्ता स्थापन करतील. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर त्यांचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असे अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात होते. मात्र फडणवीस यांनी आज याला छेद देत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आज संध्याकाळी साडे सात वाजता होणार आहे.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले असून अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे, असे म्हटले आहे.
शरद पवार यांनी याबद्दल ट्विट करताना म्हटले आहे की, “एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.