‘विधानसभेच्या उमेदवारीची दोरी फडणवीस, ठाकरेंच्या हाती’

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी युतीचे सूत्र ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात त्याबाबत चर्चा झाली आहे. हे दोघे जो निर्णय घेतील तो अंतिम असणार आहे. त्याचबरोबर भाजपला एकट्याच्या जीवावर दोनशे जागा जिंकता आल्या असत्या, परंतु युती मात्र होणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री आणि पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी केले.

श्रमिक पत्रकार संघात शुक्रवारी वार्तालापाच्या कार्यक्रमात त्यांनी युतीबाबतचे स्पष्टीकरण दिले. भाजपमधील काही आमदारांचा मतप्रवाह हा एकट्याने निवडणुका लढण्याबाबतचा होत आहे. याबाबतचे वृत्तदेखील प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे युती होणार की नाही का ऐनवेळी तोडणार असे मुद्दे उपस्थित होत आहेत. या सर्व विषयांना पूर्णविराम देत पाटील यांनी काहीही झाले तरी युती होणारच हे स्पष्ट केले. युती करताना काही सूत्रे ठरली आहे. अगदी अपवादात्मक स्थितीमध्ये काही बदल होऊ शकतात. परंतु त्याचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख घेतील, असे पाटील यांनी नमूद केले.

मी पक्ष आदेश मानणारा नेता…
मी पक्षाचा आदेश मानणारा नेता आहे. मी पक्षाकडे काही मागत नाही. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारतो. प्रदेशाध्यक्षपदही तसेच स्वीकारले आहे. मुख्यमंत्री व्हा असा आदेश दिला तर काय कराल असे विचारले असता, “नक्‍की स्वीकारेन, का नाही स्वीकारणार?’ असे उत्तर त्यांनी लगेचच दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.