सिव्हिलमध्ये सुविधांची वानवा

ऍडमिट एका कक्षात तर शौचालयाला दुसऱ्या कक्षात : पेस्ट कंट्रोलचा बोऱ्या

पेस्ट कंट्रोलच्या नावाने शिमगा

जून संपला तरी पेस्ट कंट्रोलची कामे झाली नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह रुग्णांना झुरळांचा सामना करावा लागत असल्याने रुग्णालयात पेस्ट कंट्रोलच्या नावाने शिमगा सुरू झाला असून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे.

सातारा – कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणाऱ्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक सुविधांचीही वानवा निर्माण झाली आहे. रुग्ण ऍडमिट एका कक्षात आणि शौचालयाला दुसऱ्या कक्षात जात असल्याचे चित्र आहे. मात्र, पेस्ट कंट्रोल अन्‌ इतर ठेके देण्यात व्यस्त असलेल्या जिल्हा शल्यचिकीत्सकांना रुग्णांच्या हेळसांडीकडे पाहण्यास वेळ नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

जिल्हा रुग्णालया पुढे अनेक मोठ्या समस्या आहेत, अगदी तशाच्या छोट्या मोठ्या सुविधांचीही वाणवा मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णालयात दररोज येणाऱ्या हजारो रुग्णांना साधे शौचालय सुव्यवस्थेत नाही. मात्र, माध्यमांनी त्यावर आवाज उठवल्यानंतर कर्तव्यदक्ष असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या शल्यचिकीत्सकांनी तब्बल दोन महिने उलटले तरी बाह्य रुग्ण विभागाच्या शौचालयाचा दरवाजाही बसवता आला नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे. तीच अवस्था पुरूष शल्य कक्षाची आहे. याठिकाणी असलेल्या शौचलायाला टाळा लावल्याने त्या कक्षात असलेल्या रुग्णांना शेजारीच असलेल्या कक्षात जावे लागत आहे.

गेली अनेक दिवस बंद असलेले हे शौचालय सुरू करण्यात जिल्हा शल्यचिकीत्सकांना अपयश आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील विविध कक्षात असणाऱ्या शौचालयांची अवस्था तर एखाद्या सार्वजनिक शौचालयासारखी झाल्याने हे जिल्हा रुग्णालयच आहे का असा प्रश्‍न पडतो. रुग्णालयातील अनेक कक्षात पेस्ट कंट्रोलची कामे बाकी असून संबंधित ठेकेदाराने जून महिना संपत आला तरी पेस्ट कंट्रोलची कामे न केल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाचे कारभारी पाठीशी तर घालत नाहीत ना असा सवाल विचारला जात आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सकांना दोन वेळा फोन केला मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले.

मी गेली चार दिवस माझा मामा ऍडमिट असल्याने जिल्हा रुग्णालयात जात आहे. यावेळी माझ्यासह अनेक लोकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र, ते एकदाही भेटले नाहीत. तसेच शनिवारी व रविवारी त्यांना भेटने गरजेचे असतानाही ते सुट्टी असल्याने पुण्याला गेल्याचे सांगण्यात आले.

सोमनाथ कदम, सातारा

Leave A Reply

Your email address will not be published.