कलंदर: योगायोग !

उत्तम पिंगळे

जागतिक योगदिनानंतर महाराष्ट्राचे सरदार व उधोजी राजे यांची एकाच ठिकाणी भेट झाली.
सरदार: नमस्कार राजे, आज आपली भेट अचानकच ठरली होती. काल दिवसभर मी बाबा रामदेवांसोबत मुंबई बाहेरच होतो.
राजे: हो, बघितलं मी तुम्हाला योग करताना आणि तुम्हाला त्याची गरज निश्‍चितच आहे.
सरदार: तुम्हाला म्हणजे आपणास नाही का?
राजे: आमच्या कुटुंबाकडेच काय पूर्ण खानदानाकडे पाहा. अवजड किंवा वाटेल तसे ओबडधोबड वाढणारा कुणीही व्यक्‍ती सापडणार नाही. योग आमच्या रक्‍तातच आहे.
सरदार: बरोबर आहे, शिवछत्रपतींचे राज्य आणू पाहणारे आपण आपल्याही प्रकृतीच्या बाबतीत सदैव जागरूक असता.
राजे: बरं ते जाऊ दे, बैठकीत ठरल्याप्रमाणे आपल्या लोकांना आपण जरा तंबी द्या. कोणीही उठून काहीही युतीबाबत बरळू नये. मी व आपले दिल्लीतील वरिष्ठ योग्य निर्णय घेणार आहोतच.
सरदार: आपण म्हणता ते बरोबर आहे. मीही वरिष्ठांच्या कानी घालून आपल्या इतर लोकांनी नको तेथे काहीही बरळू नये अशा सूचना देतो.
राजे: बरं मग यापुढे कुणावर डोळा आहे?
सरदार: म्हणजे? मी समजलो नाही काही?
राजे: वा… वा… सरदार, अगदी वकिली केली नसली तरी वकिलांच्याही तोंडात मारली हो. नाही म्हणजे माझे म्हणणे असे होते की, आता कुणाला गळाला लावणार ?
सरदार: नाही हो, कुणालाही नाही. जे लोक आमच्या पक्षाची तत्त्वे आचरणात आणणार आहेत. त्यांच्याबाबतीत विचार करू. (राजे सूचक मान डोलावतात)
राजे: मग आता नाणार प्रकल्प रायगडात हलवणार हे नक्‍की ना ?
सरदार: होय, कारण तुमचाच विरोध होता मग काय करणार ? शेवटी आपले युतीचे सरकार आहे व तसेच राहणार आहे. त्यामुळे आपला शब्द खाली पडणार नाही.
राजे: ठीक आहे, पण रायगडी बघू काही विरोध होतो का ते ?
सरदार: नाही होणार, रायगड मुंबईच्या जवळ आहे व कित्येक जमीन खार जमीन म्हणून घोषित केली आहे. तिथे ना धड शेती होते मग कसा काय विरोध होईल ? त्यामुळे आपण जातीने लक्ष घाला. एक तर आपली सीटही आपण घालवली.
राजे: आम्ही घालवली ?
सरदार: होय, आपण मागच्या निवडणुकीत नवीन चेहरा दिला तर नक्‍कीच फरक पडला असता. असो तो तुमचा निर्णय आहे. आम्ही त्यात काही दखल घेत नाही.
राजे: हा, एक-दोन ठिकाणी उमेदवार निवडण्यात नक्‍कीच चूक झाली; पण आता विधानसभेच्या वेळी तसे होणार नाही. काही लोकांना आम्हीही डच्चू देणार आहोत.
सरदार: मग आता योग आपण सर्व शाखांमध्ये सुरू करणार का ?
राजे: तसं अगदीच नाही. कारण मुळातच आमचे कार्यकर्ते मावळे आहेत. ते काटक आहेत.
सरदार: नुसता काटकपणा कामाचा नाही. व्यक्‍तीचे मनही स्थिर व संयमी लागते. त्यामुळे केवळ शरीर कणखर न होता मनही प्रसन्न राहावे लागते तरच कार्यकर्ता चांगले काम करू शकतो.
राजे: पण योगाची गरज आपल्याच कार्यकर्त्यांना जास्त आहे. त्यांच्या शरीराला व मनालाही योग आवश्‍यक आहे. मन प्रसन्न झाले की त्यांचा वाचाळपणाही बंद होईल.
(दोघेही हसत एकमेकांना नमस्कार करून निघतात.)

Leave A Reply

Your email address will not be published.