विनोद मोहिते (प्रतिनिधी इस्लामपूर)-
मित्र-मैत्रिणींच्या जुन्या फोटोंवर ‘भाऊ’ आणि ‘ताई’ या नावाने उखाण्याप्रमाणे यमक जुळवून चारोळ्या कमेंट्स करण्याचा ट्रेंड नेटकऱ्यांमध्ये भलताच हिट झाला आहे. कोरोनाच्या विषाणूने सध्या जगभरात थैमान घातले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी देशातही २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे रिकाम्या वेळेत तरूणाई फेसबुकवर मित्र-मैत्रिणींची फिरकी घेत आहेत.
सोशल मीडियावर कोणता ट्रेंड कधी हिट ठरेल हे सांगता येत नाही. सध्या असेच “भाऊ आणि ताई’चा ट्रेंड फेसबुकवर चर्चेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई आहे. कुणी बाहेर जाऊ शकत नाही आणि कुणी घरी येऊ शकत नाही. त्यामुळे टीव्ही किंवा मोबाईलवर अनेक जण वेळ घालवत आहेत.
मिळालेल्या फावल्या वेळेचा उपयोग इंटरनेटवर अधिक करीत आहेत. सोशल मीडियावरील हा वेळ अधिक मनोरंजक बनविण्यासाठी नेटकऱ्यांकडून नवनवीन शक्कल लढविली जात आहे. अशाच शक्कलीतून ‘भाऊ’ आणि ‘ताई’च्या फोटोंवर चारोळ््या कमेंट्स करण्याचा हा ट्रेंड सध्या भलताच लोकप्रिय झाला आहे. मित्र किंवा मैत्रीणीचे चार-पाच वर्षाआधीचे फोटो फेसबुकवरून उकरून काढायचे आणि त्यावर मजेदार कमेंट करायचे. विशेष म्हणजे येथेही कोरोना आणि लॉकडाउन हेच केंद्रस्थानी आहेत.
उदाहर्णार्थ-
-‘आला वारा गेला वारा, मॅडमचा फोटो म्हणजे कोरोनामध्ये सुगंधित सॅनिटायझरचा फवारा’
-ताईचा फोटो पाहून पोर आली धावून, म्हणून सरकारला करावं लागलं २१ दिवस लॉकडाउन’,
-‘कोरोनामुळे जगात सुरू झाली मंदी, आम्हाला ताईच्या लग्नात खायची आहे बुंदी’,
-” कढईत जसे उकळते तेल ताई तुझ्या समोर सगळे मॉडेल फेल.’
-‘पगार मिळाला नाही म्हणून कामगारांनी केला संप, आमच्या मैत्रीणीच्या प्रेमात पडला चक्क डोनाल्ड ट्रम्प’,
-“वाटीत तूप तुपात माशी… ताईचा फोटो पाहून कटरीनाने पण घेतली फाशी.”
-” एक होतं घर घरात होत्या फरश्या ,,, ताईचा फोटो पाहून प्रेमात पडला परश्या.”
-“कित्येक पोरी कोमात गेल्यात कित्येकांना झालाय गम..कारण कोरोनाच्या भीतीने घरात अडकलेत हँडसम.”
-या ताईवरच्या कमेंट्सनंतर भाऊच्या कमेंटसही धडाकेबाजच म्हणावे लागेल.
-‘भुवयांच्या खाली डोळे अन डोळ्याखाली नाक, भाऊचा फोटा म्हणजे आ रा रा रा खतरनाक’,
-‘संगळे शॉप आहेत बंद मिळतो फक्त किराणा, भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराणा’,
-‘दिवसभर गावात भाऊ करतो हवा, रात्री वहिनी म्हणते भाऊला खरकटे भांडे धुवा…’
-” एक होत घर, घरात होती खुर्ची भाऊचा फोटो बघून प्रेमात पडली आर्ची.”
-” अख्या जगात पसरला कोरोना, सांगली च्या पोरी भाऊला म्हणतात ,मांग मेरी भरोना.”
-” ताजमहाल पेक्षाही भाऊंची फेमस आहे अदा, पोरीचं काय म्हाताऱ्या पण फिदा.”
अशा लई भारी चारोळ्या लोकांच्या मनोरंजनाचा विषय ठरल्या आहेत.
फेसबुकवर जुन्या आणि सध्याचा छायाचित्रांमध्ये झालेला बदल बघून, हे नेटकरी शायरीचे कमेंट त्या छायाचित्रांवर लिहिण्यात व्यस्त आहेत. यात केवळ युवकच नव्हे तर पन्नासी गाठलेले ज्येष्ठ नागरिक देखील हा नवीन ट्रेंड पाळत आहेत.