शिरूर शहरासह तालुक्यातील विदारक स्थिती : अनेक गावे कोंडीने व्यापली
शिरूर – शिरूर शहरासह तालुक्यात पार्किंग प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य रस्त्यालगत व शिरूर शहरात पार्किंग समस्या डोकेदुखी ठरली आहे. यासाठी उपाययोजना होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरासह तालुक्यातील अनेक मोठ्या गावांत हीच समस्या आ वासून उभी आहे. यावर निराकारण करण्यासाठी राज्यकर्ते, प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून कारवाईचे अस्त्र उगारण्याची गरज अधोरेखित होत आहे.
सध्या आधुनिकतेचा जमाना आहे. सर्वच ठिकाणी दिसत आहे. शिरूर तालुका हा लोकसंख्या व औद्योगिकरणामुळे विस्तारला आहे. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. रोजगारासाठी नागरिक येतात. नागरिकांकडून वाहन खरेदीसाठी चढाओढ लागली आहे. झोपडपट्टीपासून ते बंगल्यापर्यंत प्रत्येकाला आता मोटरसायकल आहे. अनेकांकडे चारचाकी गाडी आहेत. परंतु या गाड्या ठेवायच्या कुठे, हा गंभीर प्रश्न सर्वांना पडला आहे. चाळीस टक्के नागरिकांनी बांधकामात पार्किंग ठेवले आहेत.
बिल्डर लोकानी पार्किंगच गिळंकृत केली आहेत. शहर किंवा प्रमुख महामार्गावरील ग्रामपंचायत किंवा नगरपालिका याठिकाणी पार्किंग व्यवस्था सुरू केली नाही. त्यामुळे मोठ्या लोकवस्तीच्या गावात नागरिक महामार्गालगत मनमानी पद्धतीने वाहने पार्किंग करीत आहेत. त्यामुळे अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे नीट चालणे अवघड जात आहे. यावेळी नागरिक व वाहनचालकांमध्ये नेहमीच वादावादीचे प्रकार पाहायला मिळत आहेत.
त्यात नगरपालिका व ग्रामपंचायतीने पार्किंग समस्या गंभीर आहे हे लक्षात घेऊन त्यासाठी उपाययोजना करावी. तसेच ग्रामपंचायत व नगरपालिका यांना मोठया प्रमाणात आर्थिक स्त्रोत निर्माण होईल. सध्या शासन स्मार्ट सिटी बनवण्यात दंग असताना मात्र, काही भागात पार्किंगची प्रमुख समस्या निकालात निघत नाही.
बांधकामावेळी नियम धाब्यावर
प्रवासी वाहतूक करणारे सहा सिटर, रिक्षा, जीप आदी वाहने रस्त्याच्या मधोमध प्रवासी गोळा करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. त्यात अनेक छोट्या- मोठ्या अपघातांची भर पडत आहे. मात्र, संबंधित प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलीस यांनी संयुक्त कार्यवाही करणे गरजेची आहे. परंतु कारवाई कोण करणार, हा कळीचा मुद्दा बनला आहे. अनेक नागरिकांनी नवीन घरे बांधताना बांधकाम नकाशावर पार्किंग ठेवली आहेत, परंतु प्रत्यक्ष काम झाल्यावर पार्किंगच्या जागेवर व्यावसायिक गाळे बांधल्याचे दिसून येत आहेत. वाहने मात्र रस्त्यावर पार्क केलेली दिसतात, अशा लोकांवर नगरपालिका कार्यवाही करणार का, हा राज्यकर्ते, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्यादृष्टीने संशोधनाचा विषय आहे.