सुभाष कदम
शिराळा – मांगले, ता. शिराळा येथे बांधकामासाठी कृत्रिम वाळू हा चांगला पर्याय ठरला आहे. मांगले (ठाणापुडे), ता. शिराळा येथे अत्याधुनिक पश्चिम महाराष्ट्रातील पहिला वॉश वाळू प्रकल्प उभारला असून श्री मंगलनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून श्री मंगलनाथ एम सॅन्ड या प्रकल्पातून बांधकाम, गिलाव्यासाठी लागणारी वाळू ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जात असल्याची माहिती उद्योजक विजय पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने बऱ्याच वर्षांपासून नदीतील वाळू उपसा बंद झाला आहे. त्यामुळे मधल्या काळात बांधकाम व्यवसाय अडचणीत आला होता. अनेक बांधकामे बंद पडण्याच्या मार्गावर होती. याचा थेट परिणाम या क्षेत्रातील बांधकाम मजुरांवर झाला होता. मात्र, या समस्येला कृत्रिम वाळूने मोठा आधार पुढे केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून वाळू उपसाबंदी आहे. मात्र वाळू उपलब्ध नसल्यामुळे एकीकडे प्रकल्प उभारणीवर परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे बांधकाम खर्चात वाढ होत आहे. लहानसहान व्यावसायिकांना वाळू उपलब्धतेसाठी धावाधाव करावी लागत आहे. सामान्य माणूस अडचणीत आला असून घरबांधणीसाठी वाळू खरेदी करताना त्यांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. मागणी जास्त आणि उपलब्धता कमी यामुळे वाळूचा दर आवाक्याबाहेर पोहोचला आहे. याला उत्तम पर्याय कृत्रिम वाळू हा आहे.
शासकीय विभागाकडून करण्यात येणारे घरकुल, शौचालय, रस्ते, पूल आणि सरकारी इमारतींसाठी भविष्यात शंभर टक्के कृत्रिम वाळू वापरली जाणार आहे. शहरांतील पूल, फ्लायओव्हर्स, कॉंक्रीट रस्ते, मोठमोठे बिल्डिंग प्रोजेक्ट, रेडिमिक्स फ्लॅट, प्रिस्ट्रेस्ड पाईप्स यांच्या निर्मितीत अनेक ठिकाणी कृत्रिम वाळूच पर्याय असणार आहे. या कृत्रिम वाळूच्या वापराने बांधकामाची गुणवत्ता वाढते आहे, असे बांधकाम अभियंत्यांचे म्हणणे आहे.
श्री मंगलनाथ उद्योग समुहाने मांगले (ठाणापुडे) येथे प्रशस्त जागेत मोठा अत्याधुनिक कृत्रिम वॉश वाळूचा प्रकल्प उभा केला आहे. या वॉशिंग प्रकल्पामध्ये 150 मायक्रोन पर्यंतचे पीठ पाण्याद्वारे बाहेर काढून 150 मायक्रोन ते 2.36 एम. एम. गिलावा वॉश वाळू बनवली जाते. तसेच 150 मायक्रोन ते 4.75 एम. एम. कॉक्रीट व बांधकाम वाळू बनवली जाते. 100 टक्के माती विरहित स्वच्छ वाळू या प्रकल्पातून तयार होते.
श्री मंगलनाथ उद्योग समुहाने मांगले ठाणापुढे येथे कृत्रिम वाळू व गिलावा वाळू प्रकल्प उभारला असून पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच अत्याधुनिक प्रकल्प आहे. नदीच्या वाळूपेक्षा चांगली दर्जेदार वॉश वाळू या ठिकाणी तयार होत आहे. ग्रामीण व शहरी भागामध्ये जागेअभावी मोठमोठ्या अपार्टमेंट बांधकाम बंद आहेत. यासाठी 40 किलोमध्ये कृष्णा कॉंक्रीट वॉश वाळू व कृष्णा प्लास्टर वॉश वाळू उपलब्ध केले असल्याची माहिती उद्योजक विजय पाटील यांनी दिली.