पिंपरी, (प्रतिनिधी) – येत्या बुधवारी (दि. २७) संत तुकाराम बीज असून त्यानिमित्त जगद्गुरू श्री तुकाराम महाराज याच्या दर्शनासाठी देहूगाव येथे राज्याच्या कानाकोपऱयातून हजारो भाविक येतात. तुकाराम बीज निमित्त पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच उपनगरांतून देहूगाव येथे जाणाऱ्या भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही परिवहन महामंडळामार्फत जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच नेहमीच्या तिकीट दर आकारण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीकडून देण्यात आली. या जादा बस मंगळवार (दि. २६) ते गुरुवार (दि. २८) या कालावधीत धावणार आहेत.
देहूगाव व आळंदीसाठी या दोन्ही जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात स्वारगेट ते देहूगाव, मनपा भवन ते देहूगाव, मनपा भवन ते आळंदी, देहूगाव ते आळंदी, स्वारगेट ते आळंदी, पुणे स्टेशन ते देहूगाव, निगडी ते देहूगाव, हडपसर ते आळंदी या मार्गांवर बसची सुविधा असणार आहे. यामार्गांवर ये-जा करता येणार आहे.
देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी देहूगाव येथील झेंडे मळ्याजवळ मिलिटरी परिसरातील उजव्या बाजूच्या मोकळ्या जागेत परिवहन महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात असून सदर ठिकाणाहून वरील जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तसेच देहूगाव ते आळंदी दर्शन जाण्याकरीता देहूगाव-आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रीडांगणाजवळील गायरानाच्या मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात येतील. या जादा बस मंगळवार (दि. २६) ते गुरुवार (दि. २८) या कालावधीत धावणार आहेत. प्रवासी, भाविक-भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.