नवी दिल्ली – दिल्लीतील मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉंडरिंगच्या प्रकरणात के. कविता यांची न्यायालयीन कोठडी ९ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. कविता यांच्या जामीन अर्जाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीने न्यायालयाकडून मुदत मागितली होती.
त्यावर जोपर्यंत ईडी त्यांचे उत्तर तयार करत नाही तोपर्यंत कविता यांना अंतरिम जामीन दिला जावा अशी मागणी त्यांच्या वकिलाने न्यायालयाकडे केली. के. कविता यांनी त्यांच्या मुलाची बोर्डाची परिक्षा असल्याचाही हवाला देण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे आता राऊस अव्हेन्यू न्यायालयात त्यांच्या अंतरिम जामीनावर १ एप्रिल रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. दरम्यान, ईडीकडून कविता यांची जी चौकशी केली जाते आहे त्याचे सीसीटीव्ही फूटेज सुरक्षित ठेवले जावेत अशी मागणीही कविता यांच्या वकिलाने केली.
कविता प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्या साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात आणि पुरावे नष्ट करू शकतात असा ईडीचा दावा आहे. आमचा तपास सुरू असून गुन्ह्याच्या माध्यमातून मिळवलेल्या संपत्तीची चौकशी केली जाते आहे असेही ईडीने म्हटले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभागी आहेत त्यांचाही शोध घेतला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.