नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात झालेल्या घोषणेनुसार अमूल या ब्रँडची उत्पादने अमेरिकेत उपलब्ध करण्यात येणार आहेत. आता अमूल ब्रँडची पालक कंपनी असलेल्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी सांगितले की, पुढील आठवड्यापासून अमूलचेे ताजे दूध अमेरिकेतील ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना चांगला भाव मिळण्यास मदत होणार असल्याचे दिसून येते. आम्ही अनेक दशकापासून दुधाची उत्पादने इतर देशांना निर्यात करीत होतो. मात्र ताजे दूध प्रथमच बाहेर देशात उपलब्ध करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आला असल्याचे मेहता यांनी सांगितले.
यासाठी अमेरिकेतील मिशिगन दूध उत्पादक संघटनेबरोबर अमूलने सहकार्य करार केला आहे. अमूलचे हे ताजे दूध न्यूयॉर्क, न्यू जर्सी, शिकागो, वाशिंग्टन, डल्लास, टेक्सास या शहरांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. अमेरिकेतील सहकारी संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी भारतात आले असून ते अमूलच्या कामकाजाचा अभ्यास करत आहेत.
त्यांना आम्ही पूर्णपणे सहकार्य करीत असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेत बरेच भारतीय नागरिक आहेत. या नागरिकांना भारतातील दूध घेणे आवडेल. यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.
यासाठी अमेरिकेत बरीच जाहिरात मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुढील दोन-चार महिन्यांमध्ये पनीर, दही व ताक अमेरिकेत उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात अमूलची उलाढाल 18.5 टक्क्यांनी वाढून 55 हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. अमूलची उत्पादने 50 देशात निर्यात केली जातात.