प्रियांका गांधींना नडली अतिघाई; पडल्या तोंडघशी

नवी दिल्ली: काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. परंतु उत्तर प्रदेशच्या सरकारवर टीका करताना केलेल्या एका ट्विटमुळे प्रियांका चांगल्याच तोंडघशी पडल्या आहेत.

एका आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीमारामुळे शेतकरी निपचित पडला होता. याच घटनेचा फोटो गांधी यांनी ट्विट करत टीका केली होती. मात्र, थोड्य़ाच वेळात एका युजरने तो पूर्ण व्हिडीओ टाकल्याने गांधी यांच्यावर ते ट्विट डिलीट करायची वेळ आली आहे.

प्रियांका यांनी यावर, मुख्यमंत्री आताच गोरखपूरमध्ये शेतकऱ्यांबाबत मोठे मोठे भाषण देत आहेत. तर उन्नाव मध्ये त्यांचेच पोलिस शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करत आहेत. एक शेतकरी अर्धमेल्या अवस्थेत पडला आहे. त्याला आणखी मारले जात आहे, असे ट्विट केले होते. त्यानंतर उन्नाव पोलिसांनीच तो व्हिडिओ पोस्ट करत प्रियांका यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे.

या व्हिडिओमध्ये हा तरुण शेतकरी पोलिसांच्या लाठ्या वाचविण्यासाठीच असा पडला होता. पोलिस पुढे जाताच त्याने उठत धूम ठोकल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रियंका गांधींना नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली. हे कळताच गांधी यांना हे ट्विट डिलिट करावे लागले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.