पुणे- महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढून आता जास्तीतजास्त 185 होणार आहे. मात्र, त्याचवेळी शासनाचा आदेश सदस्य वाढीसाठी नसून लोकसंख्या वाढीसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेची सदस्य संख्या 9 ने वाढून 173 होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने ही वाढ लोकसंख्येवर गृहीत धरल्याने सध्याची 35 लाख 50 हजार लोकसंख्या गृहीत धरण्यात आल्याने नगरसेवकांची संख्या 9 ने वाढण्यायाचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात 185 नगरसेवक होणार, की 173? यावरून गोंधळाची स्थिती आहे.
यापूर्वी नगरसेवकांची संख्या कमीत कमी 156 आणि जास्तीत जास्त 168 असावी, असा नियम होता. मात्र, शासनाने या नियमात बदल केल्याने आता शहरात 61 प्रभाग तीन सदस्यांचे तर एक प्रभाग 2 सदस्यांचा होणार आहे. तर शहरात नगरसेवकांची तसेच प्रभागांची संख्या वाढणार असल्याने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार असून आता प्रभाग तीनचा असला, तरी मतदान मात्र 50 ते 55 हजारांचे असणार आहे. ते दोन सदस्यांच्या प्रभागांइवढेच असणार आहे. महापालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने 2011 ची लोकसंख्या गृहीत धरून तीन सदस्यांचा प्रभाग रचनेच कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेस दिले होते. मात्र, 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. करोनामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असे असू शकते गणित
जनगणनेनुसार पुणे शहराची सन 2011 ची लोकसंख्या 32 लाख
31 हजार 143 होती. त्यात 2017 मध्ये 11 गावे आल्यानंतर ही संख्या 2 लाख 39 हजार 483 ने वाढली. पुन्हा 23 गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर आणखी 1 लाख 85 हजार 198 लोकसंख्या वाढली. त्यानुसार, शहराची एकूण लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 इतकी होत आहे. तर कायद्यातील तरतुदीनुसार, 30 लाखांच्या पुढे लोकसंख्या असल्यास 161 नगरसेवक. त्यापुढे लोकसंख्या असल्यास प्रत्येक लाखास 1 नगरसेवक वाढतो. यामुळे 2011 च्या लोकसंख्येनुसार 162 नगसेवक होते. त्यात आता शासनाने 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने जवळपास 27 नगरसेवक वाढतात. त्यामुळे नगरसेवकांची संख्या 189 वर जाते. मात्र, त्याच वेळी शासनाने बदल करताना जास्तीत जास्त 185 नगरसेवक असतील असे बंधन घातले आहे.
अधिकारी म्हणातात…
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दाव्यांनुसार, शासनाने महापालिकेची लोकसंख्या 35 लाख 50 हजार गृहीत धरण्यात आले आहे. महापालिका अधिनियमानुसार 30 लाखांच्या पुढे लोकसंख्या असल्यास प्रत्येक लाखासाठी एक नगरसेवक असणे अभिप्रेत आहे. तर शासनाच्या सुधारीत आदेशात 30 लाखांच्या पुढे कमीत कमी 168 नगरसेवक असावेत असे नमुद केले आहे. त्यामुळे 35 लाख लोकसंख्या पाहता 30 लाखांपर्यंत 168 नगरसेवक तर त्यापुढील प्रत्येकी 1 लाख लोकसंख्येला 1 नगरसेवक असे गृहीत धरून नगरसेवकांची संख्या 9 ने वाढून 173 होत असल्याचे सांगण्यात येत आहे.