पुणे- “म्हाडा’ने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागातील 4 हजार 253 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार नागरिकांना येत्या शनिवारपासून (दि.29) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर घरांची सोडत ही 17 डिसेंबरला 2021 रोजी होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दिली.
केंद्र शासनाने सर्वांसाठी घरे देण्याची योजना आखली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने पाऊले उचलली आहेत. राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभाग हा नागरिकांना परवडणारी घरे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. “म्हाडा’ पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या घरांची सोडत होणार आहे.
यासाठी नागरिकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. नोंदणी प्रक्रिया येत्या शनिवारपासून सकाळी 9 वाजल्यानंतर सुरू होणार आहे. तर 30 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अशी आहे घरांची संख्या
अत्यल्य उत्पन्न गटासाठी 265 घरे, अल्प उत्पन्न गटासाठी 2 हजार 974, मध्यम उत्पन्न गटासाठी 852 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 162 घरे उपलब्ध आहेत. सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महापालिका हद्दीत 719 आणि पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत 589 घरे आहेत. याचसह प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत 2 हजार 886 घरे उपलब्ध आहेत, अशी माहिती माने यांनी दिली.