पिंपरी – राज्यातील महापालिका क्षेत्राची वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 11 ने वाढणार आहे. सध्या महापालिकेचे 128 नगरसेवक आहेत. 11 नगरसेवक वाढणार असल्याने महापालिकेची नगरसेवक संख्या 139 होणार आहे.
सध्या महापालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 सदस्य व कमाल 65 इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
2011 च्या जनगणनेच्या आधारावर महापालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष प्राप्त झालेले नाहीत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहित धरुन अधिनियमात नमूद केलेल्या महापालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किमान सदस्य संख्या वाढल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्याप्त सदस्य संख्या निश्चित होईल.
12 लाख ते 24 लाखा दरम्यान लोकसंख्या असलेल्या महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 11 ने वाढणार आहे. 2011 च्या जनगणेनुसार पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. तर, आता अंदाजे 27 लाख इतकी शहराची लोकसंख्या आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 11 ने वाढणार आहे. त्यामुळे 128 नगरसेवकांची संख्या आता 139 होणार आहे.
वॉर्ड संख्या आणि लोकसंख्याही वाढणार
सन 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 17 लाख 28 हजार इतकी आहे. पूर्वीच्या निर्णयानुसार 40 हजार लोकसंख्येचे 43 प्रभाग होणे अपेक्षित होते. मात्र 17 टक्के लोकसंख्या वाढल्याने 2 लाख 93 हजारांची भर पडणार आहे. तर प्रभागांची संख्या वाढून ती 47 इतकी होणार आहे. त्यापैकी 46 वॉर्ड हे 3 सदस्यीय असणार आहेत. तर एक वॉर्ड हा एका सदस्याचा राहणार आहे. त्यामुळे वॉर्डाच्या लोकसंख्येतही किमान 3 हजार लोकसंख्येची भर पडण्याची शक्यता असून अंदाजे 43 हजार लोकसंख्येचा वॉर्ड राहणार आहे.