नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम आहेत. ज्याच्या आसपासही कोणी नाही. यापैकीच एक म्हणजे भारताकडून एकदिवसीय क्रिकेट एकाच वर्षांत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम. आज सचिनच्या या विक्रमाला 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी हा विक्रम आजही अबाधित आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारतीय फलंदाजांनी खोर्याने धावा केल्या आहेत. अनेक वेळा, जेव्हा एखादा फलंदाज फॉर्ममध्ये असतो, तेव्हा तो सातत्याने चांगली खेळीच खेळत नाही तर शानदार शतकही करतो. एका मालिकेत असे अनेक फलंदाज आहेत जे सर्वाधिक धावा करतात आणि जबरदस्त शतके ठोकतात. मात्र, कोणत्याही फलंदाजाचा फॉर्म वर्षभर अबाधित राहून तो सातत्यपूर्ण कामगिरी करतो, असे फार कमी वेळा पहायला मिळते. या लेखातून आपण एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणार्या 3 भारतीय फलंदाजांवर नजर टाकणार आहोत.
1.सचिन तेंडुलकर (9 शतके, 1998)
एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे आणि एका वर्षात सर्वाधिक एकदिवसीय शतके करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे.
सचिन तेंडुलकर 1998 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि त्या वर्षी त्याने धावांचा डोगर उभारला होता. सचिनने 1998 मध्ये 34 सामन्यात 1894 धावा केल्या होत्या आणि यावेळी त्याची सरासरी 65.31 होती. या दरम्यान सचिनने 9 शतके झळकावली होती.
2. रोहित शर्मा (7 शतके, 2019)
नुकताच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार झालेला रोहित शर्मा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके करणार्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मासाठी 2019 हे वर्ष सर्वोत्कृष्ट ठरले आणि त्याने वर्षभरात खूप धावा केल्या होत्या.
रोहित शर्माने 2019 च्या विश्वचषकातच 5 शतके झळकावत विश्वविक्रम केला होता. रोहित शर्माने 2019 मध्ये एकूण 28 सामने खेळले आणि 27 डावांमध्ये 57.30 च्या सरासरीने 1490 धावा केल्या. यादरम्यान त्याने 7 शतके ठोकली आणि 6 अर्धशतकेही झळकावली.
3. सौरव गांगुली (7 शतके, 2000)
या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली तिसर्या क्रमांकावर आहे. सौरव गांगुली हा केवळ एक दमदार कर्णधारच नव्हता तर तो एक उत्तम डावखुरा फलंदाजही होता. जगातील महान खेळाडूंमध्ये त्याची गणना होते.
2000 मध्ये सौरव गांगुलीने 32 सामन्यात 56.39 च्या सरासरीने 1579 धावा केल्या होत्या. यादरम्यान सौरव गांगुलीने 7 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली होती.