पिंपरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. या दोन्ही याद्यांमध्ये शहरातील एकालाही स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून मनसेचे शहरातील विधानसभेच्या मैदानात उतरणार की नाही? अशी चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 तारखेला मतदान होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे विधानसभा लढविणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र गत आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आणि तात्काळ 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.यानंतर आज (बुधवारी) 45 उमेदवारांची यादी जाहीर केली.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व मुंबईतील उमेदवारांचा समावेश असलेली यादी जाहीर करताना पिंपरी-चिंचवड शहरातील तीन पैकी एकाही मतदारसंघातील उमेदवाराचा यामध्ये समावेश नाही. तीनही मतदासंघात मनसेकडून निवडणूक लढविण्याची काही पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. मात्र पक्षाने उमेदवारीच जाहीर न केल्यामुळे इच्छुकांमध्ये निराशा पसरली असून उद्या तरी उमेदवार जाहीर होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.