किव्ह, (युक्रेन) – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याला २ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने युरोपातील अनेक देशांच्या नेत्यांनी युक्रेनला प्रत्यक्ष भेट देऊन रशियाविरुद्धच्या या युद्धातला आपला पाठिंबा अधोरेखित केला. युक्रेनकडे सध्या दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांची टंचाई असतानाच या नेत्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला पाठिंबा दिला आहे.
इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रो आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो तसेच युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांचे विमानतळावर स्वागत करतानाचा व्हिडीओ झेलेन्सकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
जी-७ गटाचे अध्यक्षपद सध्या इटलीकडे आहे. युक्रेनच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी इटलीने जी-७ च्या सदस्य देशांची दूरदृश्य माध्यमातून एक बैठक आज बोलावली आहे. झेलेन्सकी देखील या बैठकीत सहभागी होणार असून एक संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले जाणार आहे.
युक्रेनला युरोपाचा पूर्ण पाठिंबा आहे. युक्रेनला पूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत वित्तीय, आर्थिक, लष्करी, नैतिक पातळीवर हा पाठिंबा कायम असेल, असे युरोपीय कमिशनच्या अध्यक्षा वोन डेर लेयन यांनीही म्हटले आहे. युक्रेनचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, एकता आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान करण्याची मूलभूत गरज असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पुन्हा एकदा जोर देऊन म्हटले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी युक्रेनच्या लोकांना पाठिंबा देण्याच्या ब्रिटनचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. रशियाच्या युक्रेनवरील बेकायदेशीर आक्रमणाला प्रतिसाद म्हणून मुक्त जगाची एकजूट जाहीर केली. ब्रिटनने युक्रेनला अतिरिक्त ८.५ दशलक्ष पौंड (१०.८ दशलक्ष डॉलर) मानवतावादी मदत देण्याचे वचन दिले आहे.
युक्रेनमध्ये सुमारे १४.६ दशलक्ष लोकांना, किंवा युक्रेनच्या लोकसंख्येच्या 40 टक्के लोकांना मदतीची आवश्यकता आहे, अनेक बेघर झाले आहेत किंवा अन्न, पाणी आणि वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, असे ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले.
रशियाची मोठी हानी झाल्याचा दावा
रशियाचे एक लष्करी विमान पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनने महिन्याबरात रशियाचे दुसरे मोठे विमान पाडले आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये रशियाचे सुमारे ७५ हजार सैनिक युद्धात लढताना मरण पावले असल्याचे एका त्रयस्थ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. युक्रेनमध्ये रशियाच्या नुकसानीचा वेग कमी होत नाही आणि रशियाला दररोज सुमारे १२० सैनिक गमवावे लागत आहेत.