मॉस्को – रशिया आणि इस्टोनिया या दोन्ही देशांनी आपापल्या देशामधून एकमेकांच्या राजदूतांची हकालपट्टी केली. दोन्ही देशांनी “जशास तसे’ पद्धतीने या कारवाईला प्रत्युत्तर दिले आहे. आता आपल्या देशातील दूतावासाचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांकडून केले जाईल, असे दोन्ही देशांनी म्हटले आहे.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्टोनियाचे राजदूत मॅग्नस लॅड्रे यांना पाचारण करून 7 फेब्रुवारीपूर्वी देश सोडून जाण्याचे आदेश दिले. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. इस्टोनियाने राजधानी ताल्लिनमधील रशियाच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या अचानक कमी केली.
इस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री उरमास रेनसालू यांनी रशियाच्या दूतावासात 1 फेब्रुवारीपर्यंत केवळ 8 अधिकारी आणि 15 प्रशासकीय, तांत्रिक आणि कार्यालयीन कर्मचारी ठेवण्याचे आदेश दिले होते. इस्टोनियाची ही कृती मैत्रीपूर्ण संबंधांना अनुसरून नाही, असे म्हणून रशियाने इस्टोनियाच्या राजदूतांची हकालपट्टी केली. त्यानंतर रशियाच्या या कृतीला इस्टोनियानेही “जशास तसे’ प्रत्युत्तर दिले.
#Bangladesh : अन्… बांगलादेशाने घेतला रशियाच्या जहाजाला रोखण्याचा निर्णय
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून इस्टोनियाने रशियाबरोबरचे संबंध अगदी नगण्य ठेवले आहेत. मात्र आता इस्टोनियाने रशियाबरोबरचे संबंध पूर्ण तोडून टाकण्याच्या उद्देशानेच कर्मचाऱ्यांची कपात केली असल्याचे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.