सातारा – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी,मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. नुकतंच गौतमीने एका बैलाच्या वाढदिवसाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
साताऱ्यातील एका पैलवानाने आपल्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त खास गौतमीला आमंत्रित केलं होत. बैलगाडा मालक आणि पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सतीश भोसले यांनी हे आयोजन केलं. सातारा जावळीतील खर्शी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भोसले यांचा अश्विन नावाचा बैल महाराष्ट्र चॅम्पियन आहे. त्याच्याच जन्म दिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गौतमी पाटीलला पाहण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गौतमीची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील सापडली होती. कधी तिच्या कार्यक्रमात राडा झाला म्ह्णून ती चर्चेत असायची तर कधी नाचताना केलेल्या हावभावामुळे चर्चेत यायची. लवकरच गौतमी एका चित्रपटातून सिनेसृष्टीत देखील पदार्पण करणार आहे.
सिनेसृष्टीत देखील एंट्री
लवकरच गौतमी पाटील चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार आहे. ‘घुंगरु’ असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव असून, या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीचे लाखो चाहते आहे.गौतमीच्या ‘घुंगरु’ या चित्रपटाचं शूटिंग सोलापूर, माढा, हंपीसह परदेशात झालं आहे. मात्र, या आगामी चित्रपटात गौतमी पाटील नक्की कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही.