दुबई – इंग्लंडचे क्रिकेट पंच मायकल गॉफ यांनी बायोबबलचा भंग केल्याचे समोर आल्यानंतर आयसीसीने तातडीने त्यांना विलगीकरणात पाठवले आहे. त्यांना पुढील सहा दिवस तेथे राहावे लागणार असून, त्यानंतर त्यांची करोना चाचणी केली जाणार आहे.
त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी गॉफ यांची व्यवस्था ज्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती तिथे त्यांनी बाहेरील काही व्यक्तींची भेट घेतल्याचे उघड झाले होते.
गॉफ यांनी रविवारी भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पंचाची भूमिका सांभाळली होती. आता पुढील लढतींत गॉफ यांच्या जागी दक्षिण आफ्रिकेचे पंच मराइस इरासमस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.