लंडन :– इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज ऍलिस्टर कूक याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने 2018 सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. (Former England captain Alastair Cook announces retirement from cricket) आता त्याने देशांतर्गत क्रिकेटलाही अलविदा केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कूकच्या नावावर 10 हजार धावा आहेत. अशी कामगिरी करणारा कूक इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
कूकने इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 161 सामने खेळले. त्यात त्याने 291 डावांत 12 हजार 472 धावा केल्या. त्याने कसोटी कारकिर्दीत 33 शतके आणि 57 अर्धशतके फटकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कूकने 92 सामन्यांत 3 हजार 204 धावा केल्या असून त्यात 5 शतके आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे.
कूकने केवळ 4 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात एकूण 61 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने एकूण 352 प्रथम श्रेणी सामन्यात तब्बल 26 हजार 643 धावा केल्या आहेत. त्यात 74 शतके आणि 125 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने प्रथम श्रेणी कारकिर्दीत एकूण 386 झेलही घेतले आहेत.