भुवनेश्वर :– ओडीशात एका स्थानिक क्रिकेट सामन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सामन्यात मैदानावरील पंचाने एका गोलंदाजाचा एक चेंडू नोबॉल ठरवल्यावरून वाद घडला व याच वादातून रंजन राऊत नावाच्या एका तरुणाने चाकु भोसकून थेट पंचांचाच खुन केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यात जखमी झालेल्या पंचाला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी हा हल्ला करणाऱ्या रंजन या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
ही घटना कटकमधील महिशिलंदा या गावात घडली. येथे स्थानिक ब्रह्मपूर व शंकरपूर या संघात क्रिकेटचा सामना सुरु होता. या दोन्ही संघांचा सामना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती व सामनाही रोमहर्षक होत होता. ब्रह्मपूरच्या एका गोलंदाजाचे टाकलेला एक चेंडू पंचाने नोबॉल ठरवल्यामुळे मोठा वाद घडला व त्यातूनच या पंचांचा खुनही झाला.
पंचाच्या या निर्णयामुळे ब्रह्मपूर याच गावातील रंजन याने पंचाशी वाद घातला. हा वाद वाढत गेल्यावर रंजनने खिशातून चाकू काढला व थेट पंचाला भोसकले. या घटनेमुळे दोन्ही गावांतमध्ये तणाव असून सुरक्षा दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली आहे.