गाबा (ब्रिस्बेन) – वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर रोरी बर्नसला बाद करत थाटात सुरुवात करून दिल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्ससह सर्वच गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 147 धावांवर गुंडाळला. या दोन संघात बुधवारपासून सुरू झालेल्या अॅशेज कसोटी मालिकेतील पहिल्याच कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले. मात्र, पहिल्या दिवसातील अखेरचे सत्र संततधार पावसामुळे वाया गेले.
करोनाच्या धोक्यानंतर यंदा ही मालिका अपेक्षेनुसार व ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुरू झाली. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्याच्याच अंगलट आला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी इंग्लंडची दाणादाण उडवली. स्टार्कने इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्नसचा पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडवला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने स्टार्कने करून दिलेली सुरुवात पुढेही कायम राखली. त्यांच्यासह जोश हेझलवूडनेही अफलातून गोलंदाजी केली. पहिल्याच चेंडूवर बसलेल्या धक्क्यातून इंग्लंडचा संघ सावरलाच नाही. त्यांच्या कर्णधार रूटसह सर्व प्रमुख फलंदाजांनी अत्यंत बेजबाबदारी फलंदाजी केली. त्यांची अवस्था एक वेळ 3 बाद 11 वरून 5 बाद 60 अशी झाली होती. इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात कमिन्सने पाच गडी बाद केले. तर स्टार्क, हेजलवूडने प्रत्येकी 2 आणि कॅमेरून ग्रीनने एक बळी घेतला.
आठ दशकांनंतर घडला इतिहास
ऍशेस मालिकेत तब्बल 85 वर्षांनंतर सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद होण्याची घटना घडली. यापूर्वी 1936 साली हीच घटना घडली होती. ऍशेस मालिकेच्या गेल्या 139 वर्षांच्या इतिहासात फक्त चौथ्यांदा फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. 1882 साली या दोन संघात पहिल्यांदा ऍशेस मालिका खेळवण्यात आली होती.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड पहिला डाव – 50.1 षटकांत सर्वबाद 147 धावा. (जोस बटलर 39, ओली पोप 35, हसीब हमीद 25, ख्रिस वोक्स 21, पॅट कमिन्स 5-38, मिशेल स्टार्क 2-35, जोश हेझलवूड 2-42, कॅमेरून ग्रीन 1-6).