लंडन – इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची ऍशेस कसोटी मालिका अखेर 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेतील पाचव्या व अखेरच्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव केला व मालिकेत बरोबरी साधली. या कसोटीनंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 384 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 334 धावांवर संपूष्टात आला. पाचव्या व अखेरच्या दिवशी उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 238 धावा केल्या होत्या व त्यांना विजयासाठी 146 धावांची गरज होती.
मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी बळी घेत विजय साकार केला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 4, तर मोईन अलीने 3 गडी बाद केले. स्टुअर्ट ब्रॉडने 2 बळी घेत आपल्या निवृत्तीच्या लढतीत आपल्या संघाला थाटात विजय प्राप्त करुन दिला.