लंडन :- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा समावेश केला आहे. हाच एकमेव बदल इंग्लंडने संघात केला आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करताना मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, असेही संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना येत्या बुधवारपासून(19 july) मॅंचेस्टर ओल्ड ट्रॅफोर्ड येथे सुरू होणार आहे. तिसऱ्या कसोटीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या ओली रॉबिन्सन याला संघातून वगळण्यात आले आहे.
बेन स्टोक्स याने बेन डकेट आणि जॅक क्राउली या सलामी जोडीवर विश्वास कायम ठेवला आहे. माजी कर्णधार ज्यो रुटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉर्ड, ख्रिस वोक्स व मार्क वूड यांच्यावर राहणार आहे. फिरकीची मदार मोईन अलीसह रुटवरही राहील. ऑस्ट्रेलियाने या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंड संघ – बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, मोईन अली, जॅक क्राउली, ज्यो रुट, हॅरी ब्रुक्स, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉर्ड आणि जेम्स अँडरसन.
चौथी कसोटी आजपासून मॅंचेस्टरमध्ये…
इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी आजपासून (19 july) मॅंचेस्टरमध्ये सुरू होत आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली असून, या चौथ्या सामन्यासह मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी ते सज्ज आहेत.