वीजबिलाविषयी ऊर्जामंत्र्यांची ‘मोठी घोषणा’ ;म्हणाले, “थकबाकी वसूल झाल्यानंतर…”

मुंबई : राज्यातील करोना काळातील देयक माफ करणार असल्याच्या घोषणा करून राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे अगोदरच विरोधकांच्या निशाणावर आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा अशीच एक मोठी घोषणा केली आहे. वीज देयकांची थकबाकी वसूल झाल्यावर १०० युनिटपर्यंत वीजमाफीचा विचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा मी केली होती. त्यासाठी एक उच्चस्तरीय समितीही गठित केली होती. परंतु याच काळात राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे समितीची एकही बैठक होऊ नाही. तसेच काम थांबल्याने हा प्रस्तावच तयार होऊ शकला नसल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, करोना काळात महावितरणच्या ग्राहकांवरील वीज देयकाची थकबाकी वाढून ७१ हजार कोटींवर गेली. त्यामुळे महावितरण प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. महानिर्मितीलाही कोळसा खरेदी, कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज यंत्रणेवरील विविध खर्चासाठी प्रचंड त्रास होत आहे. या स्थितीत ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणे शक्य नाही.

त्यामुळे आता महावितरणकडून थकबाकी वसुलीवर जोर देण्यात आला आहे. ही थकबाकी वसूल झाल्यावर पुन्हा या विषयाचा अभ्यास करून ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यावर विचार केला जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.