पुणे – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने मागासलेपण ठरविण्यासाठी निकष निश्चित केले आहेत. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक या निकषांच्या आधारे हे सर्वेक्षण केले जाणार असून यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी हे सर्वेक्षण करावे. पुढील आठ दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षणासाठी कर्मचार्यांची नियुक्ती करावी, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, मंडलअधिकारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका यांच्या नेमणुका कराव्यात, त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करावे, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी कमीत कमी २० कुटुंबाचे सर्वेक्षण करावे, हे सर्वेक्षणाचे काम आठ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. या सर्वेक्षणासाठी मतदार यादीचा पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.