पुणे: एनइसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये अतितटीच्या झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात क्वालिफायर ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेन्सचा 3-6, 6-1, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद संपादन केले. हा सामना जवळपास दीड तास चालला. इमाला विजयासाठी एका पॉईंटची आवश्यकता असताना बेन्सने मोक्याच्या क्षणी डबल फ़ॉल्ट केला व त्यामुळे इमाने बेन्सची दहाव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 50 डब्लूटीए गुण व 3919डॉलर अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अल्पना किर्लोस्कर, एनइसीसीचे महाव्यवस्थापक बीएसआर शास्त्री, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि डेक्कन जिमखानाचे जनरल सेक्रेटरी विश्वास लोकरे, एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, क्लबच्या फायनान्स विभागाचे सचिव गिरीश इनामदार, आयटीएफ गोल्ड बॅच रेफ्री शीतल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.