नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात आणीबाणीची परिस्थिती – कुमार सप्तर्षी

भाजपाशिवाय देशात अन्य कोणाचीही सत्ता चालेल

सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदी-शहा आणि भाजपच्या रोमारोमांत एकाधिकारशाही भिनली असून ढोंगबाज हा त्यांचा स्वभाव आहे, अशी टीका जेष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी मंगळवारी सोलापुरात एका पत्रकार परिषदेत केली.

भाजप तसेच मोदी आणि शहा हे फसवी भाषा वापरून लोकशाहीच्या नावाखाली प्रत्यक्षात एकाधिकारशाही आणतील यात तीळमात्र शंका नाही. लोकशाहीची मोडतोड करून मागील पाच वर्षात त्यांनी एकाधिकारशाही प्रस्थापित केली. मात्र आता या ऐतिहासिक टप्यावर कोणाही मतदाराने संभ्रमात रमणे किंवा प्रचारातील उथळ विचारांना फसणे हे देशाला परवडणारे नाही. मतदारांच्या संभ्रमामुळे लोकशाही संपली, तर पुढील शंभर वर्षात ती पुन्हा प्रस्थापित होणे मुश्‍किल आहे, असेही सप्तर्षी म्हणाले.

अर्थव्यवस्थेची लागली वाट —
मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेची पूर्ण वाट लागली आहे. तपास यंत्रणांची स्वायत्तता नष्ट झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेत सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. बॅंकिंग व्यवस्था कोलमडून पडली आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. तरुणांमध्ये बेकारीचे प्रमाण वाढले आहे. विद्रोही तरुणांना ठार मारण्याचा उच्चांक 2014 पासूनच्या काळातच झाला आहे. भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास देशाच्या अखंडतेला आणि एकतेला मोठा धोका संभवेल असेही कुमार सप्तर्षी म्हणाले.

न्यायव्यवस्था,शिक्षणव्यवस्था,अर्थव्यवस्था तसेच संविधानात्मक पदांचे रक्षण अशा सर्व बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अयशस्वी ठरले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत शेतकरी, अल्पसंख्यांक, दलित, बेकारीग्रस्त, तरुण नाराज आहेत. त्यामुळे 2014 साली दिलेल्या आश्वासनांचा भंग झाल्यामुळे सार्वत्रिक निराशा पसरली आहे. भाजप परत सत्तेवर येण्याची सुतराम शक्‍यता नव्हती. तेव्हा त्यांनी हुकमाचा पत्ता बाहेर काढला. मोदींनी पाकिस्तानबरोबर युद्धसदृश्‍य परिस्थिती निर्माण केली. युद्धाच्या प्रसंगात सर्व नागरिक भारतीय बनून एकजुटीने सरकारच्या पाठीशी उभे राहतात, असा आजवरचा अनुभव आहे. पुलवामाची घटना घडल्यानंतर तशीच एकजूट निर्माण झाली. या प्रसंगात विरोधी पक्ष व सामान्य जनता पंतप्रधानांच्या पाठीशी उभी राहिली. मोदी मात्र देशात आपण एकटेच शूर आहोत , मर्द आहोत असा चुकीचा प्रचार करत सुटले आहेत, असा आरोपही सप्तर्षी यांनी केला.

कोणीही चालेल पण भाजप नको –
देशात कोणाचीही सत्ता आलीतरी चालेले पण मोदी आणि भाजप पुन्हा नको , अशी उघड भूमिका मतदार जागृती परिषदेने घेतली आहे. मोदींनी देशात 60 टक्के एकाधिकारशाही आताच केली आहे. पुन्हा जर ते सत्तेवर आले तर 100 टक्के हुकूमशहा होतील. लोकशाही रद्द होईल असा धोका आपणास वाटतो. हिंदुत्ववाद हा भारतविरोधी आहे. देशाच्या संविधानाने सर्व देशवासियांना सामान अधिकार दिला आहे. परंतु मोदी व भाजपचे धोरण हे देशाचे तुकडे होण्याच्या दृष्टीने आहेत. एकूणच परिस्थिती पाहता आपल्या देशाचा पाकिस्तान होईल का ? अशी भीती कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली. देशभक्तीची व्याख्या ठरविणारे मोदी कोण आहेत ? त्यापेक्षा मतदारांनी आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करावा आणि देशात मोदी सोडून कोणीही पंतप्रधान झालेले चालेल अशी भूमिका ठेवावी असे सप्तर्षी यावेळी बोलताना म्हणाले.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.