पुणे – जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या दुकानांसाठीची वेळ दोन तासांनी वाढवण्यात आली असून, ती आता सकाळी 10 ते दुपारी 2 अशी राहणार आहे. मात्र ही सवलत 3 मेपर्यंत असणार आहे.
पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी या संदर्भात अध्यादेश जारी केला आहे. मात्र, ही सवलत अटींसह असणार आहे. जीवनावश्यक वस्तू आणि सेवांमध्ये दूध, दुग्धोत्पादन, किराणा माल, भाजीपाला आणि फळे, चिकन, मटण, अंडी विक्रीच्या दुकानांचा आणि केंद्रांचा समावेश आहे. पूर्वी काही भागात सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि काही भागात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शिथिल करण्यात आले होते.
मात्र, आता सरसकटच संपूर्ण शहरात दोन वाजेपर्यंतची कालमर्यादा ठरवण्यात आली आहे. ही कालमर्यादा वाढवली असली, तरी नागरिकांना अटींचे पालन करावेच लागणार आहे. यामध्ये मास्क, हॅन्डग्लोव्हज, फेसशिल्ड, सॅनिटायझर यांचा वापर करणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे या नियमांचे पालन करावेच लागणार आहे. याचे पालन न करणाऱ्यांवर त्वरित कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.