तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा
हैदराबाद – करोनाच्या संबंधात देण्यात आलेला लॉकडाऊनचा इशारा गांभीर्याने पाळा अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश द्यावा लागेल, असा इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्या राज्यातील जनतेला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेतही लोकांनी सरकारच्या सूचना नीट पाळल्या नाहीत त्यामुळे तेथे भीषण परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे तेथेही कडक उपाय योजावे लागले आहेत. आपल्याकडेही लोक लॉकडाऊनच्या सूचना पाळत नसतील चोवीस तास संचारबंदी आणि दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश द्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
नागरिकांनी अशी वेळ येऊ देऊ नये असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर एकही क्षण दुकान सुरू राहिलेले दिसले तर त्या दुकानाचा परवाना रद्द केला जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तेलंगणामध्ये करोनाचे 36 रुग्ण आढळून आले आहेत. 19 हजार लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.