नवी दिल्ली – खासगी सुरक्षा एजन्सीज्नी त्यांच्याकडे कामाला असलेल्या सुरक्षा गार्डसचे 21 दिवसांच्या लॉकडाऊन काळातील वेतन कापु नये अशी सुचना केंद्रीय गृहमंत्रालाने केली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वच संस्था, आस्थापना, दुकाने आणि एकूणच व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने सुरक्षा गार्डना त्या ठिकाणी काही काम उरलेले नसले तरी त्यांच्या समस्यांकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहून त्यांचे या काळातील वेतन कपात केली जाऊ नये अशी सुचना गृहमंत्रालयाने या सुरक्षा एजन्सीजना केली आहे.
सेंट्रल असोशिएशन ऑफ प्रायव्हेट सिक्युरिटी इंडस्ट्री या संघटनेला तसेच त्यांच्याशी संबंधीत अन्य संघटना आणि संस्थांना गृहमंत्रालयाने पत्र पाठवून ही सुचना केली आहे. करोनामुळे भारतात अभुतपुर्व स्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या संबंधात मानवतावादी भूमिकेतून सहकार्य केले जावे अशी अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय उद्योग महासंघ आणि अन्य संबंधीत संस्थांनाही ही सुचना करण्यात आली आहे.