नवी दिल्ली – हमीभाव, नोकरी, अग्निवीर, पेन्शनच्या मुद्द्यांवरून शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून पुन्हा एकदा केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. त्यांनी शेतकरी आणि दुकानदारांनाही या भारत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.
राकेश टिकैत यांनी सांगितले की, १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये संयुक्त किसान मोर्चासह इतर अनेक संघटना सामील झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारी रोजी शेतात काम करू नये. अमावस्येच्या दिवशी शेतकरी शेतात काम करत नाहीत.
त्यामुळे १६ फेब्रुवारी रोजी अमवास्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये. दुकानेही बंद ठेवण्याची विनंती आहे. यामध्ये एमएसपी, नोकरी, अग्निवीर, पेन्शन आदी मुद्दे मांडले जाणार आहेत. देशात कृषी संप झाला तर मोठा संदेश जाईल.
बेरोजगारी, पेन्शन, अग्नीवीर, एमएसपी आदी मुद्द्यांवरून देशभर संप पुकारण्यात आला आहे. या संपात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, तसेच देशभरातील शेतकरी आणि वाहतूकदारांनीही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी निवेदन जारी करून १६ फेब्रुवारी रोजी भारत बंदची घोषणा केली होती.
या संघटनांनी एमएसपीवर पीक खरेदीची हमी द्यावी, अजय मिश्रा टेनी यांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, लहान आणि मध्यम शेतकरी कुटुंबांची कर्जमाफी आणि कामगारांना किमान २६ हजार रुपये प्रति महिना वेतन मिळावे अशी मागणी या संघटनांनी केली आहे.