पिंपरी, (प्रतिनिधी) – चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २४) व रविवारी (दि. २५) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे.
महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने वसूली मोहिमेला वेग देत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पुणे जिल्हा – १६६ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी ६,९८,५८६ ग्राहकांकडे आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सध्या सुरू असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीजजोडण्याची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे. थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.