वॉशिंग्टन – 2024 हे वर्ष कसे असेल याबाबत सर्वांनाच कुतहल असले तरी या वर्षात जगातील अनेक देशांमध्ये महत्त्वाच्या निवडणुका होणार असून हे वर्ष निवडणुकीचे वर्ष म्हणूनच गाजणार आहे. भारतासह अमेरिका, रशिया, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश या जगातील तब्बल 64 देशांमध्ये यावर्षी निवडणुका होणार आहेत.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये लोकसभा निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त भारतातील काही प्रमुख राज्यांमध्ये सुद्धा या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारता पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मोठी लोकशाही असलेल्या अमेरिकेची अध्यक्ष निवडणूकसुद्धा 2024 च्या अखेरीस होणार आहे.
गेल्या कित्येक वर्षांच्या कालावधीत प्रथमच ही निवडणूक गाजण्याची शक्यता दिसत आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान असलेल्या इंग्लंडमध्ये सुद्धा यावर्षी निवडणुका होणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये इंग्लंडमधील राजकारण अस्थिर राहिले असल्याने यावर्षीच्या निवडणुकीमध्ये कदाचित सत्ताबदल होऊ शकतो, अशा प्रकारचे संकेत राजकीय धुरीणांनी दिले आहेत.
सध्या युक्रेन सोबत लष्करी संघर्षात मग्न असलेल्या रशियामध्ये सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये अध्यक्ष निवडणूक होणार आहे आणि विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुन्हा एकदा त्याच पदावर विराजमान होतील असे संकेत मिळत आहेत.
भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये सुद्धा येत्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये निवडणुका होणार आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत तर गेले कित्येक वर्ष विजनवासात असलेले नवाज शरीफ पुन्हा एकदा सक्रिय झाले असल्यामुळे नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग आणि इमरान खान यांचा तेहरिक ए इन्साफ या दोन पक्षांमध्येच ही निवडणूक होणार आहे.
मात्र भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी हा पक्ष सुद्धा काही चमत्कार घडवू शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे. भारताचा आणखी एक शेजारी बांगलादेशमध्ये सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे. जगातील 64 देश आणि युरोपियन युनियन मधील सत्तावीस देशांमध्ये निवडणूक होणार असून,
2024 मध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 49 टक्के लोकसंख्या या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहे. प्रमुख देशांमध्येच ही निवडणूक होणार असल्याने आगामी कालावधीमध्ये जागतिक राजकारणाची दिशा कशी असेल हे या निवडणुकीतील निकालावरून स्पष्ट होणार आहे.