मुंबई : राज्यातील पोटनिवडणुकीनंतर आता राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. कारण राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या परिषदेतील गटनेतेपदी खडसेंची निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या प्रतोतपदी अनिकेत तटकरेंची निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना याबाबतचे पत्रही देण्यात आले होते. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल असे पक्षाचे राजकीय गणित असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने मोठी जबाबदारी दिली गेली असल्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपॆक्षा असल्याचे म्हटले जात आहे.