नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाच्या आरोपांवरून रेल्वेला कडक तंबी दिली आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीविषयी रेल्वे उदासीन असल्याचे आयोगाने म्हटले आहे. एका रेल्वेगाडीतील चहाच्या कपांवर मैं भी चौकीदार ही घोषणा छापण्यात आल्याचे नुकतीच उघडकीस आले. त्यावरून निवडणूक आयोगाने रेल्वेला नोटीस बजावून गुरूवारपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. अहवाल मिळाल्यानंतर रेल्वेकडून आचारसंहितेचा भंग झाला का याची शहानिशा आयोगाकडून केली जाईल. कपांच्या आधी रेल्वेच्या तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले असल्याचे समोर आले होते. त्या तिकिटांचा संदर्भ देत निवडणूक आयोगाने आचारसंहितेला गांभीर्याने घेत नसल्याचे ताशेरे रेल्वेवर ओढले. लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशभरात आचारसंहिता लागू आहे.