नवी दिल्ली – बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी सरकारीखर्चाने स्वताचे जे पुतळे उभारले आहेत व स्मारके निर्माण केली आहेत त्याला आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी मायावती यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. त्या म्हणाल्या की लोकांच्या इच्छेनुसारच आपण या पुतळ्यांची उभारणी केली आहे.
केवळ पक्षाच्या निवडणूक चिन्हांचा प्रसार करण्याचा या मागचा आपला हेतू नव्हता असेही त्यांनी नमूद केले आहे. एका प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांनी आपले म्हणणे आज सुप्रिम कोर्टात सादर केले. या पुतळे उभारणीसाठी आणि स्मारक उभारणीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून निधी दिला गेला आहे. त्याला राज्यविधीमंडळाची मान्यता मिळाली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.