नवी दिल्ली – मध्य प्रदेशात आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत कॉंग्रेस-सपा पाच जागांवर एकमेकांविरोधात लढणार असल्याचे दिसून येत आहे. या जागा दलित, अल्पसंख्याक आणि यादव बहुल मानल्या जातात. समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस इंडिया आघाडीत जरी एकमेकांची गळाभेट घेताना दिसत असले तरी विधानसभा निवडणुकीत ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
इंडिया आघाडीत सामील झाल्यानंतर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले होते की ते जागा वाटून घेतील. या रणनीतीअंतर्गत त्यांनी मध्य प्रदेशात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीचे समीकरण लक्षात घेऊन कॉंग्रेस मध्य प्रदेशात सपाला काही जागा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र आजपर्यंतची परिस्थिती उलट दिसून येत आहे. कॉंग्रेसने राज्यातील 230 पैकी 144 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. यानंतर आज सपानेही नऊ उमेदवारांची घोषणा केली. यात पाच जागांवर कॉंग्रेस आणि सपाचे उमेदवार आमनेसामने आहेत.
सपाने जाहीर केलेल्या अन्य चार जागांवर कॉंग्रेसने अद्याप उमेदवार उभे केलेले नाहीत. या जागांवर कॉंग्रेसच्या दोन ते तीन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरू असल्याचे कॉंग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. या उमेदवारांची नावे पुढील यादीत निश्चित केली जाणार असल्याचे समजते.